Expired Chocolates Dumped near Highway: महामार्गालगत असलेल्या एका कचराकुंडीत स्थानिक चॉकलेट कारखान्याने एक्स्पायर्ड झालेल्या चॉकलेट्सचे खोके उघड्यावर फेकून दिल्याने मोठा गोंधळ उडाला. ही माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी आणि रस्त्याने जाणाऱ्यांनी ते चॉकलेट्स गोळा करण्यासाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एकच गर्दी केली. रंगीबेरंगी खोकी उचलून पळून जाणाऱ्या लोकांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये लोक सायकली, मोटारसायकलवरून तसेच खांद्यावर खोकी घेऊन पळताना स्पष्ट दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना घडली.
2024 मध्येच मुदत संपलेले खाद्यपदार्थ; आरोग्याशी खेळ झाल्याचा समाजसेवकांचा आरोप
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याने उघड्यावर फेकलेल्या या सर्व चॉकलेट्सची मुदत 2024 मध्येच संपली होती. मुदत संपलेले हे अन्नपदार्थ उघड्यावर टाकल्यामुळे ते लहान मुले किंवा नागरिक खाऊन आजारी पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक समाजसेवकांनी कारखाना मालकाच्या या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला असून, रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे धोकादायक कचरा टाकल्याने लोकांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचे म्हटले आहे.
This is beyond comprehension. A chocolate factory in Kanpur throws away expired chocolates, and people rush to take them home. How people reached this point ? People need to stop treating “free” as automatically worth taking.? pic.twitter.com/HxEMQY4ULr — Vineeth K (@DealsDhamaka) August 24, 2026
हेही वाचा – Viral Video : हा कसला माज? मंदिरातच भाजप आमदाराच्या लेकीनं महिला पोलिसाच्या कानशिलात लगावली; FIR दाखल
डीसीपी पश्चिम एस. एम. कासिम अबिदी यांचे आदेश; पांकी पोलिसांकडून चौकशी सुरू
सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर कानपूर पोलीस प्रशासन तात्काळ हरकतीत आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी पश्चिम एस. एम. कासिम अबिदी यांनी पांकी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मुदत संपलेले अन्नपदार्थ टाकून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दोषी कारखाना मालकावर एफआयआर करण्याची तयारी; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर या प्रकरणात दोषी असलेल्या चॉकलेट कारखाना मालकाविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात येणार आहे. अशा प्रकारे एक्स्पायर्ड झालेले अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी अत्यंत प्राणघातक ठरू शकते, असा इशाराही वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कचऱ्यात सापडलेले असे दूषित किंवा मुदत संपलेले पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.